मंगळवार, ९ मे, २०१७

 

#काहीबाही ३ - पावसाळलेला मी

वळवाच्या पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब उन्हांनं रापलेल्या मनाला आणि शरीराला एवढा सुखावून जातो कि वाटतं बस् हाच तो परमोच्च क्षण ज्यासाठी आपली मनं युगानुयुगं आतुरली होती, हीच ती वेळ जेंव्हा स्वतः स्वैर वाऱ्यावर स्वार होऊन दशदिशांवरून येणाऱ्या वर्षाशरांनी घायाळ व्हावं, त्याला मिठीत घेऊन तसंच पडून राहावं अंगअंग शहारुन जात नाही तोपर्यंत.पण आजूबाजूला सारे तत्वज्ञानी येणाऱ्या पावसाचा एकही थेंब शरीरावर पडू न देता आडोशाला जाऊन शाश्वत-अशाश्वताच्या, द्वैत-अद्वैताच्या, सगुण-निर्गुणाच्या गप्पांपासून पाऊस पडण्या मागच्या (ऐकिवातील) विज्ञानापर्यंतच्या कथा एकमेकांच्या गळी उतरवण्याच्या अनाठायी प्रयत्नात दिसतायत. मनाची आणि घराची कवाडं बंद करून पावसाच स्वागत करणाऱ्यांनो, तुम्ही तसेच भिंतीआड छपराखाली निश्चळासारखे पडून रहा, याद राखा जर तुम्ही पावसाला नुसता ऐकण्याचा जरी प्रयत्न केलात तर, तर तो कर्णमधुर स्वर पेलवणार नाही तुमच्या नाजूक कर्णपटलांना. त्यापेक्षा कोंडून घ्या स्वतःला अशा अंधाऱ्या कोठडीत जिथे हे स्वर्गीय सुख कधी फिरकणारही नाही. मी मात्र आभाळानं मायेने शिंपडलेले पाण्याचे टपोरे मोती सर्वांगाने झेलून घ्यायच्या प्रयत्नात सुखासीन चिंब भिजून, पाणी आणि तप्त मातीच्या सुवासाने भारून गेलेल्या हवेला मुक्तपणे लपेटून घेताना माझा मलाच दिसतोय.

©संदेश मुळे
Share:

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा