गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

 

शिलंगण

(भारताबाहेर जायचा जरी योग आला नसला तरी) जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी असलो तरी कोणताही सण आला कि घरची ओढ लागतेच, आणि दसरा(विजयादशमी) असली म्हणजे जरा जास्तच.
आमच्या गावातला दसरा त्यातल्या त्यात खूपच अलौकिक आणि आत्मीय आनंद देणारा असतो, त्याचं कारणही तसंच आहे. आमच्या कडे कसं असतं कि गावातल्या मोठ्या मैदानावर आपट्याच्या पानांची मोठी पेंडी ठेवलेली असते. त्याला गावाचे पाटील किंवा प्रतिष्ठित व्यक्ती ती पेंडी तलवारीनं तोडतात आणि गावातील सगळ्या लहान मोठ्या व्यक्ती ते सोनं लुटून घेतात त्यात मी ही असतो.
हि सोनं लुटायची अशी परंपरा जरी असली तरी माझे बाबा सांगतात कि पूर्वी ते सोनं गावाच्या ईशान्य दिशेला शिवेवर ठेवलेलं असे आणि ते घोड्यावर जाऊन लुटून आणलं जात होतं.
याच बरोबर तिथे गावातल्या वेगवेगळ्या देवांच्या पालख्या एकत्र जमा होतात. मग सगळे जण सगळ्या पालख्यांचे दर्शन घेऊन एकमेकांना सोनं देतात. जे समवयस्क असतात ते एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना रामराम म्हणतात,वयानं लहान लोक मोठ्यांच्या पाया पडून त्यांना सोनं देतात. वर्षभर ज्यांचे चेहरे हि पाहायला मिळत नाहीत किंवा जे परगावी राहतात ते सारे तिथे भेटतात, त्या सगळ्या लोकांसोबत आणि पालख्यांसोबत गावातल्या सगळ्या देवळात फिरून साऱ्या देवांना सोनं द्यायचं त्यानंतर विजयी मुद्रेनं घरी आलं कि  कुठलीशी लढाई जिंकून घरी आल्याच्या आनंदात औक्षण करून घ्यायचं.
आणि पोशाखा  बद्दल सांगायचं राहिलं कुठलाही पारंपरिक पोशाख घालायचा सोबत टोपी घालायची आणि त्या टोपीमध्ये घरच्या घटामधील धांन्याची छोटी रोपं तुरे म्हणून  खोवायची.
हेच सारं आमचं सीमोल्लंघन आणि हेच शिलंगण.
या सर्वाहून दुसरा आनंद तो काय असेल, शहरात या परंपरा नाही जपल्या जात मुळात असं काही असतं याची कल्पनाही शहरातल्या लोकांना नसते त्यांच्यासाठी असे सण म्हणजे चित्रपटात दाखवलेली प्रतीकात्मक कल्पना. त्यातल्या त्यात मी ज्या शहरामध्ये राहतो सोलापुरात(एक असं शहर ज्याने जागतिकीकरणाच्या बदलत्या काळातही स्वतः इथल्या परंपरा जपल्या आहेत) तिथे अजूनही ह्या परंपरा जपल्या जातात त्याबद्दल सविस्तर लिहीन नंतर केंव्हातरी. सध्या हे सारं वर्णन माझ्या गावाचं आहे कासेगावचं. 

तळटीप  -  वर उल्लेखलेली सोनं हि संज्ञा आपट्याच्या पानाला दिलेली आहे.
Share: