शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

 

पत्र


मनाच्या आचारसंहितेत, शब्दांना हाताशी धरून भावनांनी बंडखोरी केली. अभ्रकासारख्या पांढऱ्याशुभ्र कागदावर रक्तरंजित आंदोलनं केली. वाळूत पाऊलांचे ठसे उमटावेत तशी अभ्रकावर चित्रविचित्र पण एकसंध नक्षी तयार झाली, भावनांच्या आणि शब्दांच्या पाउलांची.
मी आभाळभरून प्रयत्न केले तरी भावनांची बंडखोरी मोडणं मला शक्य झालं नाही, पण मी प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यातच त्यांच्या बंडखोरीला जुन्या आठवणींची नवी कुमक मिळाली.
या द्वंद्वातच माझा पराभव झाला आणि या साऱ्यांची साक्ष असलेला तो इवलासा अभ्रकाचा तुकडा, तिच्यासाठी लिहिलेलं "पत्र" झालं.
जे कि तिने दिलेल्या डायरीत, तिनेच लिहिलेल्या त्या एका पानाच्या मागे अजुनही पत्त्याविना तसेच आहे आणि माझ्यानंतरही अनंतकाळापर्यंत तसेच राहील.


©संदेश मुळे
Share:

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

 

कृष्णविवरा सारखे शून्य

कसं होतं, आपल्या आयुष्यात खूप सारे प्रसंग, खूप साऱ्या गोष्टी घडुन गेलेल्या असतात, भले त्या चांगल्या असो किंवा वाईट. तेवढ्यापुरतं त्या गोष्टीचा आनंद किंवा दुःख होतं, नंतर आपण ती गोष्ट विसरून हि जातो, पण तरी आपल्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, जर आपल्या वर्तमानात त्या इतिहास जमा गोष्टी आठवल्या तरी त्याचं एवढं काही वाटत नाही. फक्त हे सगळे प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रंगीबेरंगी माञ वाटतात हे नक्की. 
त्यातच कधीतरी (म्हणजे वर्तमानात!!) तुम्हाला काहीतरी महत्वाचं समजतं, जे कि तुम्हाला माहित असायला हवं असतं पण माहित नसतं, किंवा सभोवतालच्या पंचमहाभूतांनी ते जाणून बुजून तुमच्या पासून लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यात तुम्हाला या नव्याने कळलेल्या गोष्टीचा रंग आणि आधी माहित असणाऱ्या साऱ्या गोष्टींचा रंग यात साम्य वाटायला लागतं. 
तुम्ही मग हि नवीन गोष्ट मध्यवर्ती ठिकाणी ठेवून बाकीच्या गोष्टी त्याला रंगसंगतीनुसार जोडायचा प्रयत्न करता आणि त्याचा “रुबिक क्युब” होतो, तोही एकसंध रंग-संगती नसलेला आणि सुरु होते शर्यत तुमच्या कल्पनाशक्ती आणि आकलन शक्तीची. 
अथक परिश्रमानंतर जेंव्हा हि शर्यत संपते. तेंव्हा रंगसंगतीनुसार एकसंध जोडलेल्या प्रसंगांचा “रुबिक क्युब” तुमच्या हातात असतो. जेंव्हा हे सारं कोडं सुटून त्या गोष्टींचं आकलन होतं तेंव्हा तुम्हाला हसावं कि रडावं तेच कळत नाही. स्वतःची किव यायला लागते. पण तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्ही शून्य झालेले असता, कृष्णविवरा सारखे शून्य. 


©संदेश मुळे
Share: