शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

 

पत्र


मनाच्या आचारसंहितेत, शब्दांना हाताशी धरून भावनांनी बंडखोरी केली. अभ्रकासारख्या पांढऱ्याशुभ्र कागदावर रक्तरंजित आंदोलनं केली. वाळूत पाऊलांचे ठसे उमटावेत तशी अभ्रकावर चित्रविचित्र पण एकसंध नक्षी तयार झाली, भावनांच्या आणि शब्दांच्या पाउलांची.
मी आभाळभरून प्रयत्न केले तरी भावनांची बंडखोरी मोडणं मला शक्य झालं नाही, पण मी प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यातच त्यांच्या बंडखोरीला जुन्या आठवणींची नवी कुमक मिळाली.
या द्वंद्वातच माझा पराभव झाला आणि या साऱ्यांची साक्ष असलेला तो इवलासा अभ्रकाचा तुकडा, तिच्यासाठी लिहिलेलं "पत्र" झालं.
जे कि तिने दिलेल्या डायरीत, तिनेच लिहिलेल्या त्या एका पानाच्या मागे अजुनही पत्त्याविना तसेच आहे आणि माझ्यानंतरही अनंतकाळापर्यंत तसेच राहील.


©संदेश मुळे
Share:

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

 

कृष्णविवरा सारखे शून्य

कसं होतं, आपल्या आयुष्यात खूप सारे प्रसंग, खूप साऱ्या गोष्टी घडुन गेलेल्या असतात, भले त्या चांगल्या असो किंवा वाईट. तेवढ्यापुरतं त्या गोष्टीचा आनंद किंवा दुःख होतं, नंतर आपण ती गोष्ट विसरून हि जातो, पण तरी आपल्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, जर आपल्या वर्तमानात त्या इतिहास जमा गोष्टी आठवल्या तरी त्याचं एवढं काही वाटत नाही. फक्त हे सगळे प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रंगीबेरंगी माञ वाटतात हे नक्की. 
त्यातच कधीतरी (म्हणजे वर्तमानात!!) तुम्हाला काहीतरी महत्वाचं समजतं, जे कि तुम्हाला माहित असायला हवं असतं पण माहित नसतं, किंवा सभोवतालच्या पंचमहाभूतांनी ते जाणून बुजून तुमच्या पासून लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यात तुम्हाला या नव्याने कळलेल्या गोष्टीचा रंग आणि आधी माहित असणाऱ्या साऱ्या गोष्टींचा रंग यात साम्य वाटायला लागतं. 
तुम्ही मग हि नवीन गोष्ट मध्यवर्ती ठिकाणी ठेवून बाकीच्या गोष्टी त्याला रंगसंगतीनुसार जोडायचा प्रयत्न करता आणि त्याचा “रुबिक क्युब” होतो, तोही एकसंध रंग-संगती नसलेला आणि सुरु होते शर्यत तुमच्या कल्पनाशक्ती आणि आकलन शक्तीची. 
अथक परिश्रमानंतर जेंव्हा हि शर्यत संपते. तेंव्हा रंगसंगतीनुसार एकसंध जोडलेल्या प्रसंगांचा “रुबिक क्युब” तुमच्या हातात असतो. जेंव्हा हे सारं कोडं सुटून त्या गोष्टींचं आकलन होतं तेंव्हा तुम्हाला हसावं कि रडावं तेच कळत नाही. स्वतःची किव यायला लागते. पण तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुम्ही शून्य झालेले असता, कृष्णविवरा सारखे शून्य. 


©संदेश मुळे
Share:

शनिवार, ८ जुलै, २०१७

 

#काहीबाही ६ - खजिना


परवा मिळाले काही,
पुसट झालेल्या अक्षरांचे निनावी कागद,
झिरझीर झालेली जाळीदार पिंपळपानं,
काटे नसलेला पण दरवळणारा तो गुलाब,
तो शाईपेन आणि एकंच पान लिहिलेली डायरी,
त्यातलेही काही शब्द कसल्याश्या पाण्याने पुसटलेले,
आणि एका पुरचुंडीत बांधलेले क्षणही सापडले
अबोल्याचे, रुसव्याचे, प्रेमाचे, ओढीचे,
काही तुझे, काही माझे
सारे एकमेकांना घट्ट बिलगून बसलेले.
खूप काही सापडलं आणि वाटलं हाच तो
मी ना शोधलेला पण अनाहूतपणे सापडलेला #खजिना,
प्रत्येकाला किमान एकदा तरी घराच्या किंवा
मनाच्या अडगळीत सापडतोच असा.

©संदेश मुळे

Share:

सोमवार, १९ जून, २०१७

 

#काहीबाही ५ - आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

"विस्कटून विखुरलेल्या आयुष्याला वेचता वेचता दमछाक व्हावी, विस्मरणात गेलेले काळजाचे ठोके चुकवणारे आठवणींचे दुवे सापडावेत आणि दुव्याला लागून अजून काही दुवे हातात यावेत...अनंतकाळापर्यंत हाच खेळ चालत राहावा त्यात त्या करत्या करावीत्याने माझ्या भाबडेपणावर गालातल्या गालात हसून हलकेच फुंकर घालून गोळा केलेले सारे क्षण पुन्हा विखरून टाकावेत.....म्हणजे समुद्रकिनार्याची वाळू घट्ट मुठीत पकडून पाण्यात उभारल्या सारखा वाटेल....वाळू मुठीत कितीही घट्ट पकडली तरी ती निसटणारच आणि तो फेसाळलेल्या समुद्राने पुन्हा त्याच निर्मिकासारखे निर्विकार हसावे. मग मीही आभाळाकडे पाहून हलकंसं हसूनच मनातल्या मनात त्याला म्हणावं तू काहीही केलंस तरी मी सुद्धा हरणाऱ्यातला नाही, शेवटी मीही तुझीच निर्मिती आहे."


हे असले विचार यायला लागतात म्हणूनच वाटतं आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे...

#काहीबाही #NightThought
©संदेश मुळे

Share:

गुरुवार, ११ मे, २०१७

 

#काहीबाही ४ - निरर्थक

त्याला त्याचीच लाज वाटू लागली, स्वतःच्या नैतिक जवाबदारीची वेस ओलांडून तो केंव्हाच असंख्य प्रकाशवर्ष दूर निघून गेला होता.
बोथट झालेल्या जाणीवा कधीच स्वतःच्या निष्क्रियतेच्या काळजाचा ठाव घेऊ शकल्या नव्हत्या. मनातली सल कुरूप होऊन साऱ्या मनाला उध्वस्त करू पाहतेय आणि हा पश्चतापचं रुचिक टाकून कुरूप बरं करण्याचा निरर्थक प्रयत्न करु पहातोय.भेगाळलेल्या जन्माचा उत्तरार्ध अजून कोणत्या यातना देणारे काय माहित.
या साऱ्या जन्माच्या तात्विक आणि शब्दरंजित वाक्-दृक् यातनांचा लेखाजोखा नजरेसमोरून जात नव्हता आणि तो सूर्याजन्माच्या आधीपासून सताड उघड्या डोळ्यांनी झोपायच्या प्रयत्नात स्वतःच्या नेणिवांना कुरवाळत या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय.

©संदेश मुळे
Share:

मंगळवार, ९ मे, २०१७

 

#काहीबाही ३ - पावसाळलेला मी

वळवाच्या पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब उन्हांनं रापलेल्या मनाला आणि शरीराला एवढा सुखावून जातो कि वाटतं बस् हाच तो परमोच्च क्षण ज्यासाठी आपली मनं युगानुयुगं आतुरली होती, हीच ती वेळ जेंव्हा स्वतः स्वैर वाऱ्यावर स्वार होऊन दशदिशांवरून येणाऱ्या वर्षाशरांनी घायाळ व्हावं, त्याला मिठीत घेऊन तसंच पडून राहावं अंगअंग शहारुन जात नाही तोपर्यंत.पण आजूबाजूला सारे तत्वज्ञानी येणाऱ्या पावसाचा एकही थेंब शरीरावर पडू न देता आडोशाला जाऊन शाश्वत-अशाश्वताच्या, द्वैत-अद्वैताच्या, सगुण-निर्गुणाच्या गप्पांपासून पाऊस पडण्या मागच्या (ऐकिवातील) विज्ञानापर्यंतच्या कथा एकमेकांच्या गळी उतरवण्याच्या अनाठायी प्रयत्नात दिसतायत. मनाची आणि घराची कवाडं बंद करून पावसाच स्वागत करणाऱ्यांनो, तुम्ही तसेच भिंतीआड छपराखाली निश्चळासारखे पडून रहा, याद राखा जर तुम्ही पावसाला नुसता ऐकण्याचा जरी प्रयत्न केलात तर, तर तो कर्णमधुर स्वर पेलवणार नाही तुमच्या नाजूक कर्णपटलांना. त्यापेक्षा कोंडून घ्या स्वतःला अशा अंधाऱ्या कोठडीत जिथे हे स्वर्गीय सुख कधी फिरकणारही नाही. मी मात्र आभाळानं मायेने शिंपडलेले पाण्याचे टपोरे मोती सर्वांगाने झेलून घ्यायच्या प्रयत्नात सुखासीन चिंब भिजून, पाणी आणि तप्त मातीच्या सुवासाने भारून गेलेल्या हवेला मुक्तपणे लपेटून घेताना माझा मलाच दिसतोय.

©संदेश मुळे
Share:
 

#काहीबाही २ - निद्राराक्षस

रात्रीच्या उदरात दडलेले शांततेचे भेसूर आवाज ऐकण्याचा मोह अनावर होऊ लागला ना की समजाव कि मागचे कितीही लक्ष जन्म कुणीही असलो तरी किमान या जन्मी तरी सटवीनं निशाचराचंच भाग्य पाचवीला पुजताना कापाळी लिहिलेलं आहे.
आता कृष्ण पक्षातील चंद्र अमावस्येची ओढ लागून सूर्याविना काळ्याशार अंधारामध्ये कुठे गडप झालेला आहे देव जाणे. शुक्ल पक्षातील प्रतिपदेशिवाय त्याला आता हुंकार फुटणे केवळ अशक्य.
तसंही निशाचराला कुठे कुण्या प्रकाशाच्या मेहेरबानीची गरज असते म्हणा.
या क्षणी रात्र अजून गहिरी होत चाललीय, अढळ ध्रुव सुद्धा झोपेने पेंगुळल्या सारखा नभांगणावर डुलक्या घेतोय.
सध्या तरी माझ्या श्वासाशिवाय कोणताच आवाज माझ्या कानाचे पडदे भेदून आत जातोय असा वाटत नाहीये. पहाटेचा प्रहर सुरु व्हायला लागला तरी रात्रीचा मोह काही सुटेनासा झालाय.
मनामधल्या व्योमातून अंतराळाच्या शेवटापर्यंत हि रात्र भरून आहे. अगदी ओतप्रोत.
मी निशाचर गुडघे पोटात घेऊन रात्रीच्या कुशीत निजलोय, ती आपल्या काळ्या कभिन्न हाताने मला थोपटून शांततेची अंगाई गातेय आणि मी अनंत काळचा जागा असल्या सारखा उजेडाची स्वप्नं पाहत सुखानं झोपी गेलेलोय.

© संदेश मुळे
Share:

सोमवार, ८ मे, २०१७

 

#काहीबाही १ - संध्यास्वप्न..

मि गगनाला गवसनी घालायला निघालोय, उत्साह शिगेला पोहोचला आहे.
पण आता तो तात्पुरता वाटायला लागलाय. 
दोन क्षणांचा उत्साह, बाकी क्षण फक्त निरुत्साह गिळून निपचित पडलेल्या अजगरासारखेच...
आता सगळा प्रवास सुर्यमालेतील कोणत्यातरी कृष्णविवरातुन होतोय असे भास होतायत..
अचानक आकाशगंगेतील तारका जेव्हा पायाखालून जायला लागल्या तेव्हा निरुत्साह झुगारून, उत्साह आणि भिती हातात हात घालून जिव्हरी थैमान घालायला लागले,
समोरच्या ढगांवरुन विजांचा थयथयाट चालला आहे ना अगदी तसाच.
एका क्षणात सारं आयुष्य नजरेसमोरुन धावत गेलं...
विद्युत वेगानं भीतीचा लवलेश मस्तकातुन काळजाकडे त्याची लय चुकवायला धावतो न् धावतो तोच...अंगावर आलेल्या शहाऱ्यांमुळे संध्यास्वप्नातुन जाग आली....

© संदेश मुळे 
Share: