मंगळवार, ९ मे, २०१७

 

#काहीबाही २ - निद्राराक्षस

रात्रीच्या उदरात दडलेले शांततेचे भेसूर आवाज ऐकण्याचा मोह अनावर होऊ लागला ना की समजाव कि मागचे कितीही लक्ष जन्म कुणीही असलो तरी किमान या जन्मी तरी सटवीनं निशाचराचंच भाग्य पाचवीला पुजताना कापाळी लिहिलेलं आहे.
आता कृष्ण पक्षातील चंद्र अमावस्येची ओढ लागून सूर्याविना काळ्याशार अंधारामध्ये कुठे गडप झालेला आहे देव जाणे. शुक्ल पक्षातील प्रतिपदेशिवाय त्याला आता हुंकार फुटणे केवळ अशक्य.
तसंही निशाचराला कुठे कुण्या प्रकाशाच्या मेहेरबानीची गरज असते म्हणा.
या क्षणी रात्र अजून गहिरी होत चाललीय, अढळ ध्रुव सुद्धा झोपेने पेंगुळल्या सारखा नभांगणावर डुलक्या घेतोय.
सध्या तरी माझ्या श्वासाशिवाय कोणताच आवाज माझ्या कानाचे पडदे भेदून आत जातोय असा वाटत नाहीये. पहाटेचा प्रहर सुरु व्हायला लागला तरी रात्रीचा मोह काही सुटेनासा झालाय.
मनामधल्या व्योमातून अंतराळाच्या शेवटापर्यंत हि रात्र भरून आहे. अगदी ओतप्रोत.
मी निशाचर गुडघे पोटात घेऊन रात्रीच्या कुशीत निजलोय, ती आपल्या काळ्या कभिन्न हाताने मला थोपटून शांततेची अंगाई गातेय आणि मी अनंत काळचा जागा असल्या सारखा उजेडाची स्वप्नं पाहत सुखानं झोपी गेलेलोय.

© संदेश मुळे
Share:

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा