रविवार, २८ जुलै, २०१९

 

प्रवास मंथन

जवळपास गेली २४ तास किंवा जास्तच वेळ झाला सलग पाऊस पडतोय, तोही भयानक किंवा आपण ज्याला राक्षसी म्हणू ना अगदी तसा..म्हणजे मुंबई साठी हे काय नवीन नाहीये. पावसानं हवं तसं यावं, वाटेल तितक्या वेळ पडावं आणि प्रत्येक मुंबईकराने "हे साला काय नवीन नाय आमच्यासाठी" असं म्हणून पुढे जात रहावं असो..
तर मुद्दा असा की एका बाजूला मुंबईत गेल्या २४ - २५ तासांमध्ये जवळपास २८०मिमी पाऊस पडलाय..आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा या दोन्हीकडे मिळून गेल्या 12 महिन्यात सरासरी पाऊस २५० पेक्षाही कमी पडलाय...
एकूण पाहता निसर्गाचं पावसाच्या बाबतीतलं गणित चुकल्यासारखं वाटतं..किंवा असं म्हणू शकतो की काही प्रमात आपण ते चुकवलय.
आणि एवढं सगळं होत असताना देखील काही अपवाद वगळता अजुन कुणाला जाग आलीय असं तरी दिसत नाहीये. म्हणजे आपलं एकच काम, एकतर निसर्गाला तरी दोष द्यायचा नाहीतर सरकारला तरी दोष द्यायचा. त्याचं फलित काय मिळतं, तर शून्य.
माझ्या वाचनात असाही आलंय की ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या २०-२५ वर्षामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि त्याला पूर्ववत करायला जवळपास पुढची शंभरेक वर्षे तरी लागतील. यावरून ही परिस्तिथी किती गंभीर आहे हे लक्षात येईल.

एक गोष्ट मान्य की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात पण तरी आताची परिस्थिती गेल्या १० वर्षांपेक्षा तर खूपच वाईट झालीय.. वातावरण बदलामुळे म्हणा किंवा अनिर्बंध पाणी उपसा असो किंवा अतोनात पाण्याचा अपव्यय म्हणा यामुळं भूजलपातळी जवळपास संपलीय (नुकत्याच चेन्नई बाबतच्या बातम्याही वाचलेल्या). कधी कधी भीती वाटायला लागते की खरंच हे जे ऐकतोय ते खरं तर होणार नाही ना..आणि आजूबाजूचे लोक जसे वागतात ते पाहून तर त्याला अजुनच बळ मिळायला लागतं.

पण खरंच परिस्थिती अजूनही एवढी हाताबाहेर गेलेली नाही आपण अजूनही सावरू शकतो याला प्रचंड अशी वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागेल. मी स्वतः पासूनच सुरुवात केलीय.  या परिस्तिथी बदलासाठी मला जे शक्य होतं ते मी करतो. एक गोष्ट लक्षात आलीय की उपदेश करण्याने काही बदलत नाही त्यापेक्षा आपणहून सुरुवात करावी म्हणून केली. ज्याला ज्यावेळी परिस्थितीची झळ पोचेल तो त्यावेळी सुरूवात करेल आपल्याला उमगली तर आपण वेळ का दवडायचा..आपण चालत राहायचं.

तसं तर माझं गाव सोलापूर, आणि सध्या मी मुंबईत राहतो त्यामुळं दोन्हीकडची परिस्तिथी पाहिलीय मी. सध्या मुंबई पुणे प्रवासात आहे..एका बाजूला दरीत कोसळणारा राक्षसी पाऊस आणि दुसऱ्या बाजूला असंख्य पाऊसवाटांनी अमानवीय कातळाच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि मध्ये मुठीत जीव धरून बसलेला मी आणि अजुन कितीतरी जीव. अशा वेळेस लिहावस वाटतं म्हणून लिहिलं.
हे वाचून एखाद्याच्या विचाराला किंचीतजरी चालना मिळाली तर मी ते माझ्या लेखणी चं फलित समजेन.
रजा घेतो, भेटू पुन्हा अशाच प्रवासातल्या कुठल्या तरी टप्प्यावर.

तळटीप - माझा या विषयावरचा एवढा अभ्यास नाही पण जे वाचनात येतं, ऐकतो किंवा पहातो त्यावरून माझी मत बनतात. ही सर्वस्वी माझी मतं आहेत तुमच्या दृष्टिकोनातून ती वेगळी ही असू शकतात.

- संदेश मुळे
#सोलापूरकर_मुंबई_पुणे_प्रवासात

Share:

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा